भावसंगीताच्या क्षितिजावरील अढळ शुक्रतारा म्हणून आपण सर्वच जण ख्यातनाम गायक अरुण दाते यांना ओळखतो. आपल्या मधुर स्वरांनी अरुण दाते यांनी अनेक गीते अजरामर करून रसिकांच्या हदयात आपले खास असे स्थान निर्माण केले आहे. याच अरुण दातेंच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त अरुण दाते कला अकादमी आणि रोहन पाटे यांच्या वतीने पुण्यात ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार दि. ४ मे, २०१९ रोजी सायं. ५.३० वाजता, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.
कार्यक्रमात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक राजीव बर्वे, गायिका प्रियांका बर्वे यांचा सहभाग असून चित्रपट अभिनेत्री अनुश्री फडणीस या निवेदन करणार आहेत. याबरोबरच अरुण दाते यांचे सुपुत्र व कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते अतुल दाते हे स्वत: आपल्या वडिलांच्या कारकीर्दीतील रसिकांनी सहसा न ऐकलेल्या आठवणींचा खजिना उपस्थितांसमोर उलगडून दाखवतील तर संगीता बर्वे यावेळी काव्यवाचन करणार आहेत. या कार्यक्रमाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दृकश्राव्य माध्यमातून (ऑडिओ व्हिज्युअल) स्वत: अरुण दाते यांचा सहभाग.
याविषयी अधिक माहिती देताना अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते म्हणाले की, अरुण दाते हे नाव ऐकल्यावर मराठी रसिकांना आठवतात ती अवीट गोडीची असंख्य भावगीते. ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही आणि अशी अनेक गीते अरुण दाते यांनी आपल्या मधुर स्वरांनी अजरामर तर केलीच. याबरोबरच रसिकांच्या हृदयात आपले खास असे स्थानही निर्माण केले. आजी-आजोबांपासून आजच्या तरुणाईपर्यंत पिढ्यांपिढ्यांनी त्यांची गीते ऐकली आहेत, मनात साठवली आहेत आणि त्यांची अक्षरशः पारायणे देखील केली आहेत. अशा या प्रतिभावान गायकाचे मागील वर्षी निधन झाले आणि हा शुक्रतारा आपल्यातून निसटला. येत्या ४ मे रोजी अरुण दाते यांचा जन्मदिवस आहे तर ६ मे रोजी त्यांचा पहिला स्मृतीदिन आहे. याचेच औचित्य साधत पुण्यात आम्ही पहिल्या अरुण दाते संगीत महोत्सव अर्थात अरुणोत्सवाचे आयोजन राज्यभर करीत आहोत. मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन ठिकाणी या अंतर्गत एकूण पाच कार्यक्रम होणार असून पुण्यात महोत्सवाचे दुसरे पुष्प अरुण दाते यांना ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्पण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सहभागी असणा-या कलाकारांपैकी मंदार आपटे हे ‘राधा ही बावरी’ या मालिकेबरोबरच ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचे संगीतकार आणि गायक आहेत. तर गायक राजीव बर्वे हे ख्यातनाम गायिका विदुषी मालती बर्वे आणि आणि पं. पद्माकर बर्वे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना शास्त्रीय आणि सुगम संगीताचा वारसा हा आपल्या आई- वडिलांकडून मिळाला असून ते उत्तम गायक आहेत. याबरोबरच ‘मुघल-ए-आझम’ या महानाटय़ातील अनारकली म्हणून लोकप्रिय असलेली गायिका-अभिनेत्री प्रियांका बर्वे ही देखील या कार्यक्रमामध्ये आपली गायनसेवा सादर करणार आहे. आपली आजी गायिका विदुषी मालती बर्वे, आजोबा पं. पद्माकर बर्वे आणि वडील गायक राजीव बर्वे यांचा संगीताचा वारसा प्रियांका बर्वे हिला लाभला असून बालगीते,चित्रपटांसाठी पार्श्वगायन ते संगीत रंगभूमीवरील अभिनय असा तिचा प्रवास तरुण गायकांना स्फूर्तीदायी असाच आहे. याबरोबरच कार्यक्रमाचे निवेदन करणा-या अनुश्री फडणीस या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटातील अभिनेत्री आहेत.
विशेष म्हणजे वयोमानापरत्वे अरुण दाते यांनी त्यांचा ‘शुक्रतारा’ हा गाजलेला कार्यक्रम करण्याचे थांबविल्यानंतर अतुल दाते, मंदार आपटे यांनी तो करावा अशी अरुण दाते यांची इच्छा होती आणि त्या इच्छेचा मान राखत ‘नवा शुक्रतारा’ आता नव्या रंगात, नव्या ढंगात रसिक प्रेक्षकांना भावतो आहे.