अलौकिक व्यक्तिमत्व असणा-या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशविदेशातील लोकांच्या घरोघरी नेले. आज वयाच्या ९७ व्या वर्षापर्यंत त्यांचे हे काम अव्याहतपणे चालू आहे असे प्रतिपादन विद्यावाचस्पती डॉ शंकर अभ्यंकर यांनी आज येथे केले.
सारस अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकारने पद्मविभूषण सन्मान जाहीर केल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ.अभ्यंकर अध्यक्षपदावरून बोलत होते. एअर मार्शल(निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते श्री पुरंदरे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तर शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहर संघचालक रा.स्व.संघ पुणे रविंद्र वंजारवाडकर सारस पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश धारप, उपाध्यक्ष द.सु.गोडबोले, संचालक संदिप जाधव, संचालक मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, आज भारतीय हवाईदलाने पाकिस्तानातील दहशदवादी तळांवर जो हल्ला चढवला त्याबद्दल देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे.या आनंदोत्सवात शिवशाहीर बाबासाहेबांचा जाहीर सत्कार होत आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे केवळ चरित्र नाही तर ते राष्ट्रीय चरित्र आहे. या चरित्राचा ज्यांनी प्रत्यक्ष अंगीकार केला, अशा तीन अलौकिक व्यक्ती या महाराष्ट्रात जन्मल्या. त्या म्हणजे लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. तरुण वर्गाने शिवचरित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्याची आज खरी आवश्यक्यता आहे. भूषण गोखले म्हणाले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे शिवाजी महाराजांचा चालता बोलता इतिहास आहेत, शिवचरित्र ऐकूनच मी सैन्यात जाण्याचा विचार केला होता. आज आपल्या जवानांनी जी कामगीरी केली ती अतिशय नियोजनबद्ध होती.वेळप्रसंगी पाकिस्तानात घुसुन आम्ही हल्ला करू शकतो हे यावरून आपण दाखवुन दिले आहे. सा-या देशाने लष्कराच्या मागे एकसंघपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.
गेली ९७ वर्षे अहोरात्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लोकांपर्यंत नेण्याचे काम केले त्याबद्दल त्यांना पद्मविभूषण ने सन्मानित केले त्याबद्दल सारस अर्बन पतसंस्थेने त्यांचा जो जाहीर सत्कार केला हे कौतुकास्पद काम आहे असे रविंद्र वंजारवाडकर यांनी यावेळी सांगितले.
श्री धारप यांनी सारस अर्बन पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सारस अर्बनच्या पुण्यात ४ शाखा असुन एकुण उलाढाल शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. बाबासाहेब पुरंदरे या पतसंस्थेचे स्थापनेपासुन सक्रिय सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि यासाठिच आज आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत.
सारस अर्बन तर्फे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मुख्यव्यवस्थापिका श्रुती सोमण यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले, पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.