‘पहिलीच भेट झाली, पण ओढ़ ही युगांची…’ ,’केतकीच्या बनी तिथे नाचलागं मोर…’ आणि ‘जीवना तु कसा मी असा…’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी …’ ही आणि यासारख्या गीतांनी आज अरुण दाते यांच्या स्मृतींना गीतरुपी आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अरुण दातेंच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त अरुण दाते कला अकादमी आणि रोहन पाटे यांच्या वतीने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे.
रोहन पाटे, आमदार मेधा कुलकर्णी, बुकगंगाचे मंदार व सुप्रिया जोगळेकर, मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, गौरी देव आणि अरुण दाते यांचे स्नेही हिमांशु कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘शुक्रतारा’ या अरुण दाते यांच्या आत्मचरित्राच्या दुस-या आवृत्तीचे आणि ‘हात तुझा हातातून’ या अतुल दाते लिखित पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक राजीव बर्वे, गायिका प्रियांका बर्वे यांनी अरुण दाते यांची गाणी सादर केली. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी यावेळी कार्यक्रमाचे निवेदन केले. याबरोबरच अरुण दाते यांचे सुपुत्र व कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते अतुल दाते यांनी यावेळी अरुण दाते यांच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या. तर संगीता बर्वे यांनी काव्यवाचन केले.संगीता बर्वे यांनी अवेळी अरुण दातेंवर त्यांनी लिहिलेली एक कविताही सादर केली.
यावेळी अरुण दातेंनी गायलेले ‘श्रीराम जय राम, जय जय राम…’ हे भजन, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तु मला…’ हे मारवा रागावर आधारित गीत, ‘दिवस तुझे हे फुलायचे…’, ‘जादू कशी घड़े ही या दोन लोचनांची…’ हे १९६५ साली अरुण दाते यांनी गायलेल्या गीताची प्रस्तुती कलाकारांनी केली. यानंतर ‘भेट तुझी माझी स्मरते अजून त्या पिसांची …’, ‘डोळे कशासाठी… पुन्हा साठवून मिटून घेण्यासाठी… ‘ या सादर झालेल्या गाण्यांना अरुण दाते यांना गीतरुपी श्रद्धांजाली अर्पण करण्यात आली.
‘जपून चाल पोरी जपून चाल…’या लावणीने आणि ‘शुक्रतारा मदवारा…’ या गीतांवर तर रसिकांनी अक्षरश: ठेका धरला.
कार्यक्रमाला झंकार कानडे (कीबोर्ड), प्रसन्न बाम (संवादिनी), अमित कुंटे (तबला), अभिषेक काटे (ऑक्टोपॅड), प्रशांत कांबळे (साउंड), रमाकांत परांजपे (व्हायोलीन) व सायली सोनटक्के (व्हिज्युअल्स) यांनी साथसंगत केली. स्मिता लाटे यांनी सूत्र संचलन केले.