ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज भीमसेन स्टुडिओजचे उद्घाटन करण्यात आले. पवार यांनी आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळच्या क्रीडासंकुलात होत असलेल्या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला भेट देत शास्त्रीय संगीताचा आनंद घेतला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, उपेंद्र भट, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, विनायक पाटील, विठ्ठल मणियार,खासदार अनिल शिरोळे आणि सतीश मगर हे देखील या वेळी उपस्थित होते
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने भीमसेन स्टुडिओज या नावाने एक यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे. त्याचेच उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या यू-ट्यूब चॅनलवर सवाई गंधर्व दरम्यान आपली कला सादर करणा-या कलाकारांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जाणार असून केवळ कलाकाराची कलाच नाही तर त्यामागची त्याची मेहनत, परिश्रम आणि कलाकार कसा घडतो हे त्यातून रसिकांसमोर उलगडणार आहे हे विशेष. या माध्यमातून कलाकाराला समजून घेण्याचा आणि त्याला रसिक श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा पद्धतीने तब्बल ४० कलाकारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या असून त्या आपल्या सर्वांसमोर येणार आहेत.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या या नवीन उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. एक प्रकारे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन करणारा असा हा भीमसेन स्टुडिओजचा उपक्रम आहे. पं . भीमसेन जोशींनी अनेक कलाकारांना संधी दिली आणि त्यांना सवाईच्या माध्यमातून व्यासपीठ देखील देऊ केले. पं. भीमसेन जोशींना अनेकदा ऐकण्याची संधी मला मिळाली. दिल्ली, बारामती, पुणे अशा अनेक ठिकाणी मी पं. भीमसेन जोशी यांचं गायन ऐकलं आहे. पंडितजी राग मालकंस आणि दरबारी गायला लागले की त्यांनी तासंतास गावे अशी माझी भावना व्हायची अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
पं. भीमसेन जोशी यांनी अनेकांना केवळ गाण्यासाठी नाही तर गाणं ऐकण्यासाठी देखील प्रोत्साहित केलं ही त्यांची खासियत आहे, असे देखील यावेळी पवार यांनी आवर्जून नमूद केले.
३०- ४० वर्षांनी आज मी सवाई गंधर्व महोत्सवाला आलो आहे. त्यावेळी तिकीट काढून यायचो आणि मागे बसून गाणे ऐकायचो या वर्षी मात्र फुकट आलो, असे ते मिश्लिकपणे म्हणाले. रमणबागेतून यावर्षी महोत्सव महाराष्ट्रीय क्रीडा संकुलात आला आहे आणि त्याचे स्वरूप व्यापक झाले आहे. ते असेच व्यापक होत जावे यासाठी त्यांनी या वेळी शुभेच्छा दिल्या.
पं. भीमसेन जोशी यांनी ६६ वर्षांपूर्वी लावलेलं रोपटं त्यांच्या पुढच्या पिढीने जपलं आहे, जगवलं अन् वाढवलं देखील आहे याचा आम्हाला आनंद आहे . देशातील एक महत्त्वाचा महोत्सव असलेल्या या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवाला रसिकांची साथही अशीच कायम राहील असा विश्वास देखील पवार यांनी यावेळी व्यक्त केला.