24.1 C
New York
Thursday, November 7, 2024

Buy now

spot_img

८ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय ‘कॉपी’

आजच्या दैनंदिन जीवनात कॉपी शब्द अनाहुतपणे वापरला जातो. मोबाईलच्या आजच्या काळात कॉपी-पेस्ट ही कृती प्रत्येकाकडून अनाहुतपणे होत असते, पण शालेय जीवनात मात्र ‘कॉपी’ या शब्दाचा अर्थ खूप गहन असून नकारात्मक आहे. एखाद्याचं शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणा-या या ‘कॉपी’चा नवा अर्थ चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचं शीर्षकही कॉपी असं ठेवण्यात आलं आहे. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा आशयघन सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

‘कॉपी’ या शीर्षकाचा सिनेमा बनवण्याची मूळ संकल्पना असलेल्या गणेश रामचंद्र पाटील यांनीच या सिनेमाची निर्मितीही केली आहे. पलाश भीमशी वधान यांच्या भारत एक्सीमची प्रस्तुती असलेल्या ‘कॉपी’चा मोशन पोस्टर लाँच झाल्यापासून सिनेसृष्टीपासून सिनेरसिकांमध्ये या सिनेमाविषयी कुतूहल आहे. टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हे कुतूहल उत्कंठेत बदललं आणि उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, विविध पातळीवर वेगवेगळ्या जबाबदा-या सांभाळत ख-या अर्थाने ‘कॉपी’ सिनेमा घडवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. दिग्दर्शनासोबतच त्यांनी राहुल साळवे यांच्या साथीने या सिनेमाची कथासुद्धा लिहिली आहे. याशिवाय दयासागर आणि हेमंत यांनीच या सिनेमाची पटकथाही लिहिली आहे. दयासागर यांनी एक पाऊल पुढे टाकत अर्थपूर्ण संवादलेखन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही यशस्वीरीत्या सांभाळली आहे.

या सिनेमाचा विषय सर्वव्यापी आहे. सर्वांच्याच जीवनात आज शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो शिकला तो मोठा झाला असं नेहमीचं म्हटलं जातं, पण जगासमोर स्वतःला सिद्ध करण्यापूर्वा प्रत्येकाला शिक्षण व्यवस्थेच्या दिव्यातून बाहेर पडावं लागतं. आज शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांसोबत पालकही होरपळत आहेतच, पण एखाद्या खेडयातील शाळेत प्रामाणिक ज्ञानदानाचं कार्य करणा-या शिक्षकांचीही या चक्रव्यूहातून सुटका झालेली नाही. दिग्दर्शक द्वयींनी हाच धागा पकडून आजवर कधीही समोर न आलेलं कथानक ‘कॉपी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलं आहे. खेडयातील शाळांमधील कथानक सादर करत आज महाराष्ट्रातील शाळांमध्ये कशाप्रकारचा कारभार सुरू आहे त्याचं ज्वलंत चित्रच त्यांनी मोठया पडद्यावर रेखाटलं आहे. त्याला निर्माते गणेश पाटील यांची उचित साथ लाभल्याने प्रेक्षकांना दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा सिनेमा पहायला मिळणार आहे. एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस सिने फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणं हे ‘कॉपी’चं आणखी एक वैशिष्टय आहे.

कथानकाला न्याय देणारी स्टारकास्ट ही ‘कॉपी’ची खूप मोठी जमेची बाजू आहे. अभिनयाची चौकट मोडून आपली कला सादर करणारे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत. आजवर विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे या सिनेमात शिक्षकाच्या काहीशा गंभीर भूमिकेत दिसणार आहे. आजपर्यंत ब-याचदा पोलीसी भूमिकेत दिसलेले जगन्नाथ निवंगुणे यांनीही शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांना मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, निता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतिक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक, सिद्धी पारकर, सानिका निर्मल, सिद्धी पाटणे आणि विद्या भागवत आदी कलाकारांची अचूक साथ लाभल्याने एका वास्तववादी कथानकावर आधारित असलेल्या वास्तव वाटाव्यात अशा व्यक्तिरेखा या सिनेमात पहायला मिळणार आहे. राहुल साळवे यांनी गीतलेखन केलं आहे. नव्या दमाचे संगीतकार अशी ख्याती असणा-या रोहन-रोहन यांच्या जोडीला वसंत कडू यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं असून ध्वनी समीर शेलार यांचे आहे. वास्तववादी कथानकाचं दर्शन घडवणा-या या चित्रपटाचं छायांकन सिनेमॅटोग्राफर सँटिनिओ टेझिओ यांनी केलं असून संकलनाची जबाबदारी संजय इंगळे यांनी पार पाडली आहे. संदिप कुचिकोरवे या चित्रपटाचे कलादिग्दर्शन असून रविंद्र तुकाराम हरळे कार्यकारी निर्माते आहेत. मेकअपमन लिली शेख असून जय घोंगे, तपिंदर सिंग, साकेत चौधरी, नवनाथ गोवेकर या सिनेमाचे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा सिनेमा प्रत्येकाने पहायला हवा असा आहे.

Related Articles

Stay Connected

22,002FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles