भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, बीग बी अमिताभ बच्चन, मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक दिग्गज नेते, अभिनेत्यांसाठी विविध पदार्थ बनवून खाऊ घालून प्रशंशा मिळविलेले आणि सलग 53 तासात 750 हून अधिक शाकाहारी पाककृती बनवून गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्यांची नोंद झाली आहे ते प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर आता पिंपरी चिंचवड मधिल शाकाहारी खवैय्यांना ‘विष्णूजी कि रसोई’ तून भेटणार आहेत.
‘विष्णूजी की रसोई’ हा महाराष्ट्रीयन व पंजाबी भोजनाचा ब्रँन्ड महाराष्ट्रभर प्रसिध्द आहे. नागपूर, औरंगाबाद, पुण्यातील खवैय्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘विष्णूजी की रसोईचे’ नेहरुनगर – झिरो बॉईज चौक पिंपरी येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून सुरु झाले आहे. शुक्रवारी (दि. 8 मार्च) विष्णू मनोहर यांच्या हस्ते मैत्री केटरर्सच्या पुर्वा जोशी, दिपंकर भाकरे, शिरीष जोशी, उदय भाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
सर्व सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे शाकाहारी भोजन लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या जिभेचे चोचले पुरविणारे आहे. यामध्ये महाराष्ट्रीयन व पंजाबी असे दोन्ही खाद्य पदार्थ पारंपारिक पध्दतीने पानात दिले जातात. एका वेळी पाचशे ताटांची जेवण्याची व्यवस्था होईल असा सुसज्ज हॉल उपलब्ध असून बुफे पध्दतीची जेवणाची व्यवस्था आहे. ताटात जवळपास अनेक प्रकारच्या चटण्यांचे प्रकार व पंजाबी जेवणात दाल फ्राय, जिरा राईस, एक पनीर भाजी, पंजाबी प्रकारची वेगळी भाजी, तंदूर रोटी, नान इ. प्रकार असतात. त्यानंतर मराठी जेवणात झुणका भाकर, ठेचा, पालक, मेथीची पातळ भाजी, वडा भात, गोळा भात, कढी खिचडी व एक चमचमीत भाजीचा प्रकार असतो. विदर्भातील सुप्रसिध्द पुरणपोळीचा ही आस्वाद घेता येईल. शेवट गोडाचा एखादा पदार्थ जसे गुलाबजाम, जिलेबी, मालपुवा, हलवा असे प्रकार असतात. शेवटी विड्याच्या पानाचे, तबक सजवलेले असते. येथील पदार्थांची जीभेवर रेंगाळणारी चव, स्वच्छता व आदरातिथ्य खवैय्यांच्या पसंतीस उतरेल असेच आहे.
विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव भरविण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. त्यांनी 2018 साली नागपूर येथे 3000 किलोग्रॅम व दिल्ली येथे 5000 किलोग्रॅमची खिचडी बनवली होती. तसेच 3200 किलोग्रॅमचे वाग्यांचे भरीत बनविण्याचा विक्रमही मनोहर यांच्या नावे आहे. अशाच एखादा खाद्य संस्कृतीशी संबंधीत अनोखा विक्रम आगामी काळात पिंपरी चिंचवड मध्ये करु असे विष्णू मनोहर यांनी सांगितले.