रोजगार ही देशाची मोठी गरज असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. रोजगार निर्मितीला वाव मिळावा यासाठी हे उद्योग वाढण्याची गरज आहे. केंद्राच्या नव्या उपक्रमामुळे लघु आणि मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती मिळेल,असा विश्वास
केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी व्यकत केला. येथील गणेश कला क्रिडा मंच येथे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे सबलीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. अनिल शिरोळे, केंद्रीय न्याय विभागाचे सहसचिव सदानंद दाते, बँक आँफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक दत्तात्रय डोके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बँक आँफ महाराष्ट्रचे सल्लागार वसंतराव म्हस्के, प्रशांत खटावकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृह राज्य मंत्री अहिर म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या उपक्रमामुळे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ऑनलाईन तेही केवळ 59 मिनिटांत मिळू शकते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 6 कोटी पेक्षा अधिक रोजगार आहे. या उद्योगांना प्रोत्साहन देणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. भारत देश शेतीप्रधान आहे. येथील तरुणांच्या ठायी असलेल्या कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी कौशल्य भारत आणि मेक इन इंडिया हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. अन्य देशांनी भारताकडे बाजारपेठ म्हणून न पहाता उत्पादकांचा देश म्हणून पहावे, यासाठी सरकारने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे,असे नमूद करुन अहिर म्हणाले, या उपक्रमातून रोजगार निर्मिती, उत्पादकेत वाढ आणि निर्यातीस प्रोत्साहन मिळणार आहे. मुद्रा योजनेमधून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कर्जवाटप झाल्याबद्दल श्री. अहिर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.
गृहउद्योग, ग्रामोद्योग, कुटीरउद्योग ही संकल्पना नवीन नसून जुनीच आहे. मात्र, त्याला या सरकारने फक्त चालना आणि गती दिली आहे. देशातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक साधन समृध्दीचा योग्य वापर झाला तर देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के गुंतवणूक राज्यात होते. राज्यातील गुंतवणुकीच्या 60 टक्के पुण्यात होते. जिल्ह्यात 88 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामुळे उद्योग जगतात पुणे जिल्ह्याचे महत्त्वाचे स्थान आहे. मुद्रा योजनेमध्ये पुणे जिल्ह्यात 50 हजारांपासून 10 लक्ष रुपयांपर्यंत 6 लक्ष लोकांना कर्जाचा लाभ देण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, विविध महामंडळे स्वयंरोजगार उभे करण्यासाठी कर्जपुरवठा करत आहेत. या सबलीकरण उपक्रमात पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला. बँक प्रतिनिधी, बचतगटाचे संघटक,ऑटो क्लस्टर, फॉरम्यास्युटीकल क्लस्टर आदी सर्वांच्या सहकार्याने हे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
खासदार अनिल शिरोळे यांनी 2022 पर्यंत देश विकसित होणार आहे; या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद करुन देशाची अर्थव्यवस्था वेगाने दौडणारी झाली असून रोजगार निर्मितीचे नवे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बँक आँफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक दत्तात्रय डोके यांचेही समायोचित भाषण झाले. कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे खटावकर, कॅनरा बँकेचे महाव्यवस्थापक गवारे, बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक साहू, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक डेकाटे, जिल्हा अग्रणी बँकचे आनंद बेडेकर तसेच बँकांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. अलका आठवले यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात सह संचालक एस. डी. लोकेश यांनी परदेशी व्यापार आणि ए.के. कामरा यांनी इ-मार्केटींग आणि संजयकुमार यांनी भारतीय मानक ब्युरो या विषयावर सादरीकरण केले.