आत्तापासून काही वेळात, दुपारी तीन वाजता पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातला सर्वोच्च कलाविष्कार असलेल्या “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला प्रारंभ होईल. हा ६६ वा ‘सवाई’ सोहळा यावर्षी पुण्याच्या मुकुंद नगर परिसरात महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडांगणावर साजरा होणार आहे.
ख्यातनाम गायिका बेगम परवीन सुलताना यांचे गायन हे आजच्या पहिल्या सत्राचे सर्वोच्च आकर्षण असेल. पतियाळा घराण्याच्या परंपरेच्या पाईक बेगम परवीन यांनी गेली ५० वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या हौशा – नवशा – गवशा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. ‘सवाई’ मधेही त्यांनी आपली कला सातत्याने पेश केली आहे.
आजच्या सत्राची सुरुवात औरंगाबाद चे उमेदीचे शहनाई वादक कल्याण अपार यांच्या शहनाई वादनाने होईल. कल्याण अपार यांनी त्यांचे आजोबा आणि वडील यांच्याकडून शहनाई वादनाचे धडे घेतले आणि नंतर पंडित यशवंतराव यांचे क्षीरसागर दीर्घकाळ मार्गदर्शन त्यांना लाभले. सध्या कल्याण अपार सुप्रसिद्ध सतार वादक शाहिद परवेझ यांच्या मार्गदर्शनात आपल्या कलेला नवा साज चढवत आहेत.
ख्यातनाम सतार वादक अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य आणि मैहर-सेनिया घराण्याचे ज्येष्ठ सरोद वादक बसंत काब्रा आजच्या कार्यकमात वादन करतील. गायकी अंगाने सरोद वादन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले बसंत काबरा त्यांच्या मींडकारी बद्दल नावाजले गेले आहेत. पं. काबरा यांचे सवाई गंधर्व महोत्सवातले हे पहिले सरोदवादन आहे.
आपल्या प्रयोगशील गायनाने रसिकांच्या पसंतीला उतरलेले रामपूर सहसवान घराण्याचे गायक प्रसाद खापर्डे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत या विषयातली अमरावती विद्यापीठाची मास्टर्स ही पदवी संपादन केली असून ते सध्या गोव्याच्या कला अकादमी मध्ये अध्यापन करतात. त्यांचा शिष्य परिवार भारतात आणि जगभरातही पसरलेला आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे गायक रवींद्र परचुरे यांनी वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या वडिलांकडून संगीत शिकायला सुरुवात केली आणि नंतर अप्पासाहेब फडके आणि मनोहर भागवत यांचेही मार्गदर्शन घेत आपल्या गायनाला नवे पैलू पडले. त्यांनी ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे गायक पं. अरुण कशाळकर यांच्याकडे अनेक वर्षे गुरु-शिष्य परंपरेनुसार अध्ययन केले आहे.