पुणे जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. त्यासाठी चार लोकांचे पथक तयार करण्यात आले असून 50 कुटुंबामागे एक पथक याप्रमाणे पथके असतील.
पुणे शहर व जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. यावेळी पुणे मनपा आयुक्त सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले,शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ यांना पाचारण करण्यात आले होते. नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 18 जण दगावले असून 7जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आपदग्रस्तांना तातडीने 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रोगराई होवू नये यासाठी स्वच्छतेची कामे जलदगतीने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.