पुण्यासारख्या शहरात शास्त्रीय नृत्यातील सर्व नृत्य प्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेल्या शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे नुकतेच ‘डान्स सिझन २०१९’ चे आयोजन करण्यात आले होते. जागतिक नृत्यदिनाच्या औचित्याने आयोजित या दहा दिवसीय डान्स सिझनमध्ये शास्त्रीय नृत्यसंबंधी नृत्यप्रस्तुती, प्रदर्शने, सप्रयोग व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या डान्स सिझनचा समारोप नुकताच ईशान्य मॉलच्या क्रिएटीसिटी या मंचावर पार पडला. यावेळी कथक गुरू शमा भाटे, मनिषा साठे, भरतनाट्यम् गुरु डॉ. सुचेता चाफेकर, श्रीमती पारुल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील तब्बल २७ नृत्य संस्थांनी यावेळी आपली नृत्यप्रस्तुती केली. अनेक लहान-मोठ्या शास्त्रीय नृत्यसंस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकेक रचना यावेळी सादर झाल्या. स्वर्गीय पंडिता रोहिणी भाटे यांच्या नृत्यभारती संस्थेची ‘कजरी’, गुरू पंडिता शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेचे ‘समुद्रमंथन’, गुरू पंडिता मनीषा साठे यांच्या मनीषा नृत्यालयाचे ‘नादगुंजन’, गुरू पंडिता सुचेता भिडे चापेकर यांच्या कलावर्धिनीचे ‘बाजे डमरू’ तसेच शिवस्तुती, त्रिवट, तराणा, देवीस्तुती, अभंग, तिल्लाना, गणेशस्तुती, भजन अशा एकाहून एक सरस नृत्यसंरचना या निमित्ताने एकाच रंगमंचावर सादर झाल्या. वैविध्यपूर्ण संगीत, पेहराव, उत्तम संरचनात्मक विचार हे ह्या नृत्यमैफिलीचे वैशिष्ट्य ठरले.
लीना केतकर आणि रसिका गुमास्ते यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.