1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित, 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेऊन, सर्व विद्यार्थ्यांची मतदार यादीमध्ये नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले. महाविद्यालयस्तरावर करण्यात येत असलेल्या नवमतदारांच्या नोंदणीसंदर्भात मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत, मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यावेळी म्हणाल्या, महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी मतदार यादीमध्ये करुन घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील जे विद्यार्थी अन्य जिल्हयातील रहिवासी आहेत, त्यांनी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास प्रवृत्त करावे. नवमतदारांची नोंदणी करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, ती अव्याहत चालणारी प्रक्रिया असल्याने सर्वांनी गांभिर्यपूर्वक हे काम करावे. 9 वी ते 12 पर्यतच्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागृती निर्माण होण्यासाठी, महाविद्यालयात ‘मतदाता जागृती मंडळ’ या उपक्रमाद्वारे प्रबोधन करावे अशी सूचना त्यांनी केली. यावेळी महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी त्यांनी संवाद साधून, नवमतदार नोंदणीसंबधी अडचणी जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शन केले.
दिव्यांग नवमतदार नोंदणीपासून वंचित राहू नये
नवमतदार नोंदणीबरोबरच महाविद्यालयात शिकत असलेल्या दिव्यांग नवमतदारांची परिपूर्ण नोंदणी करावी, अशी सूचना यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केली.
बैठकीला जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व तहसीलदार, निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.